ती मुलगी खूप चंचल होती. इयत्ता पहिलीतल्या या मुलीचे वर्गात लक्ष नसे. रस्त्यावरून जात असलेल्या बँडकडे ती बघत बसे. खिडकीतून दिसणारे पक्षी बघत राही. झाडावरच्या चिमण्यांशी गप्पा मारत असे. तिच्या या वागण्यामुळे तिला शाळेतून काढून टाकले ! तिची आई तिला ‘तोमोई’ नावाच्या नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी जाते. झाडांच्या खांबांचे गेट असलेली आणि रेल्वेच्या डब्यात वर्ग भरणारी ही शाळा तिला पाहताक्षणीच आवडते. शाळेचे मुख्याध्यापक ‘कोबायशी’ तिच्याशी बोलू लागतात आणि ती पूर्ण चार तास त्यांच्याशी गप्पा मारते ! तेव्हापासूनच दोघांमध्ये मैत्रीचे बंध जुळतात.
पुढे शाळेत तिला नवीन मित्र भेटतात. शाळेतले स्वच्छंदी वातावरण. रोज शाळेतील मुलांनी तास ठरवायचे. निसर्गरम्य वातावरणात सहली काढायच्या. या शाळेत जेवणाच्या डब्यासाठी पण नियम होता की रोज डोंगरातील आणि समुद्रातील पदार्थांचा आहारात समावेश असावा. यामुळे सगळ्यांना चौरस आहार मिळायचा. मुलांना आनंद वाटायचा. ‘ मुलांची नाजूक मनं जपत त्यांना शिकवणं ‘ ही कोबायाशीची पद्धत होती. मुलांना पोहायला घेऊन जाणे. अपंग मुलांना क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहन देणे. संगीताच्या तालावर कवायत करणे. मुलांच्या भावविश्वाला जाणून घेऊन त्यांच्या नजरेतून काय हवे? काय नको? असे शिकवणारे शिक्षक !
तोत्तोचानच्या संपूर्ण आयुष्याला वळण देणारी घटना घडली. शाळेत पहिल्यांदाच गप्पा मारता मारता तिचे मुख्याध्यापक म्हणाले, “तू चांगली मुलगी आहेस.” या जादूई वाक्यामुळे ती खूष झाली. आपण चांगली मुलगी आहोत हे खूप महत्त्वाचं आहे असं तिला वाटायला लागतं. ही मुलगी पुढे लेखिका होते. जपानी दूरदर्शनवरील कलाकार आणि युनिसेफच्या सद्भावना दूत बनते. ती आहे ‘ तोत्तोचान ‘ .ही एक सत्य घटना आहे.
‘ तू चांगला वा चांगली आहेस, तू हे छान केले !’. असे आपण कधी आपल्या पाल्यास म्हणतो का? नसेल तर म्हणून बघा. तुम्हांला ते मूल वेगळे दिसेल. त्याला स्वतःवर प्रेम करायला शिकवा. तू खूप भारी आहेस, चांगला वा चांगली आहेस असं सकारात्मक प्रेरणा देत राहा. त्याच्या व्यक्तिमत्त्वातले दोष सांगू नका. ते सांगितले पाहिजेत; परंतु त्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करा. ते दोष कसे दूर करायचे? हे सांगा. “तू किती छान करतोयस ! तू खूप चांगला आहेस!”, असं म्हटलं तर मुलाच्या मनात पक्क होऊन बसते की, आपण चांगले आहोत. आपल्याला प्रत्येक गोष्ट योग्यरित्या करता येते, असा आत्मविश्वास यातून निर्माण होतो.
जर त्याला वाईट म्हटलं, तर आपण वाईट आहोत असं वाटू लागतं, त्या नैराश्यातून ते अधिक वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त होते. एकीकडे शरीरातील हार्मोन्स म्हणत असतात की, “तू आता मोठा होतोय, तुझ्या शरीरात बळ आहे, एक चांगला माणूस आहेस.” दूसरीकडे घरातील कमी लेखतात. अशा परिस्थितीमध्ये पालकांचं खरं की स्वतःच्या मनाचं खरं हे कळेनासं होतं आणि ते मूल त्याच्या व्यक्तिमत्त्वाला नीट आकार देऊ शकत नाही. कारण आपण नक्की कसे आहोत? या संभ्रमातच ते संपूर्ण आयुष्य जगत राहते.
