मित्रांनो आपल्या मुलांच्या बाबतीत जर बघितलं तर सर्वप्रथम कुटुंबाच्या माध्यमातून या प्रेरणांची निर्मिती होते .मुलांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी, नंतर इतर व्यक्तींशी आणि समाजाशी संपर्क येतो आणि त्यातूनच या प्रेरणा विकसित होत जातात. शाळेत गेल्यानंतर शिक्षकच मुलांची प्रेरणा होतात.

मित्रांनो आपल्या मुलांमध्ये प्रेरणा विकसित होण्याची पहिली संधी मुलाला कुटुंबातूनच मिळत असते आणि म्हणूनच जास्तीत जास्त आपण विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काम केले पाहिजे. त्यांच्या मनामध्ये ठिणगी निर्माण झाली पाहिजे आणि मोठ्या ऊर्जेत रुपांतर होऊन आपला मुलगा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करून सर्वोच्च शिखरावर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .परंतु आपण मुलांच्या भौतिक सुख आणि सुविधांकडे जास्त लक्ष देतो. यामध्ये आता सांगितलेल्या प्रेरणा आहेत, गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. अन्न ,झोप आणि इतर शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो.
परंतु त्या गरजा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हातरी ठिणगी पडते आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर होऊन विविध क्षेत्रांमध्ये माणूस नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी तयार होतो. ही प्रेरणा आपल्याला प्रत्येक मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. जर आपण शालेय जीवन पाहिलं तर मुलाला वाचन येण्यासाठी प्रेरणा निर्माण केली पाहिजे .
मित्रांनो वाचन यायला कोणत्याही जादूगाराची गरज नसते तर मुलाच्या मनामध्ये वाचन करण्यासाठीची प्रेरणा निर्माण करणे हे आपलं पहिलं काम आहे. त्याचबरोबर मुलांना गणिताची भीती वाटत असते मित्रांनो गणित शिकणे यासाठीची प्रेरणा मुलांना विविध उपक्रम, खेळ ,कृतींतून दिली पाहिजे .अशा विविध गोष्टी सांगता येतील की ज्यातून आपण विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करून विद्यार्थी प्रत्येक अडचणी ,अडथळे पूर्ण करून शक्य तितक्या लवकर आपलं काम पूर्ण करेल. प्रेरणेची सुरुवात अडथळ्यांपासून सुरू होते.जर आपण अडथळ्यांवर प्रेरणेची ठिणगी, जिद्दीचे प्रयत्न आणि चिकाटीने उत्साह वाढवला तर आपण प्रत्येक अडथळ्यांवर मात करू शकतो.
मित्रांनो बक्षीस दिलं म्हणजे प्रेरणा मिळते असं नाही किंवा शिक्षा केली म्हणजे प्रेरणा मिळते असे नाही तर अशा कोणत्या तरी गोष्टी घडल्या पाहिजेत की ज्यातून मुलांच्या मनामध्ये प्रेरणेची ठिणगी पडेल आणि तिचं रूपांतर ऊर्जेत होईल. आता हे कसं घडत ???

हालाखीच्या कुटुंबात जन्मलेली आणि पित्याचे छत्र हरवलेली औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबल पदाच्या मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी रेल्वेने लखनऊला जात असताना ही मुलगी एका भयंकर अपघात आपला पाय गमावते .

तिच्याकडे गळ्यातील सोन्याची चेन असते ही चैन ट्रेनमध्ये चोरटे चोरण्याचा प्रयत्न करतात पण ती प्रतिकार करते आणि या झटापटीत चोर तिला दारातून बाहेर फेकून देतात. चालू रेल्वेमधून ही मुलगी दुसऱ्या रेल्वे रुळावर पडते आणि जबरदस्त मार लागल्यामुळे तिला हालचाल करता येत नाही. तेवढ्यात पडलेल्या रेल्वे ट्रॅकवरून जोरात रेल्वे गाडी येते आणि काही क्षणात कळायच्या आतच अंगावरून गाडी जाते. डावा पाय निकामी होतो. रात्रभर असह्य यातना. रात्रभर उंदीर आणि घुशी लचके तोडतात.

रेल्वेच्या रुळावर बेशुद्ध अवस्थेत तिला दुसऱ्या दिवशी काही ग्रामस्थ दवाखान्यात नेतात .परंतु तिथे सुद्धा भूलतज्ञ उपलब्ध नसतात . भूलीशिवाय पायावर शस्त्रक्रिया होते.

तिची ही सगळी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते .अशा वेळेस दिल्लीच्या एम्स रुग्णालयात तिला दाखल करण्यात येते आणि तिच्यावर उपचार केले जातात . यावेळी लोकांनी पैशांची मदत केलेली असते परंतु मानसिक धक्का देणारी आणखी एक गोष्ट घडते ते म्हणजे तिच्यावर लोकांनी बलात्काराचा प्रयत्न केला अशा खोट्या बातम्या प्रसिद्ध होतात. परंतु समाजाला तोंड द्यायचं कसं ?

अशावेळी ती जिद्द हरत नाही . दवाखान्यात असतानाच एक पुस्तके वाचण्यात येतात आणि त्याच वेळी ठरवते की जगातील सर्वोच्च गोष्ट करायची की ज्यामुळे समाजात मला सर्वोच्च स्थान मिळेल आणि म्हणून जगात सर्वोच्च काय आहे ? तर जगात सर्वोच्च आहे एव्हरेस्ट शिखर आणि म्हणून एक पाय नसतानाही ती कृत्रिम पायांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करते आणि पहिली विकलांग महिला गिर्यारोहक ठरते.

मित्रांनो सकारात्मक प्रेरणा घेतली तर आपण जगात अशक्य ते शक्य करून दाखवू शकतो . पण पण ते आपण स्वतः ठरवलेले असले पाहिजे .स्वतः ठरवलं तर आपल्या निर्णयाबद्दल इतरांना काय वाटेल? आपल्या प्रयत्नांना यश मिळेल की नाही? स्वीकारला तर आपण जिंकू किंवा मरू हे प्रश्न असतात .असे अडथळे पुढे दिसत नाहीत .

मित्रांनो दवाखान्यात असताना सकारात्मक विचारांची ठिणगी या मुलीच्या मनात पेटते आणि ही मुलगी जगातील सर्वोच्च शिखर पार करते . ती मुलगी म्हणजे अरुणिमा सिन्हा .

मित्रांनो अरुणिमा सिन्हा यांनी या प्रसंगांमधून नकारात्मकता घेतली नाही तर सकारात्मकतेने विचार करून सर्वोच्च ध्येय प्राप्त केले. आपल्या आयुष्यातही असे अनेक कठीण प्रसंग, घटना घडत असतात .परंतु आपण त्यामधून नकारात्मकता न घेता सकारात्मक प्रयत्नांनी आपले आयुष्यही सर्वोच्च बनवू शकतो. आपल्या मुलांनाही नेहमी आपण सकारात्मक प्रेरणा घेण्यासाठीच प्रोत्साहित केले पाहिजे.

मित्रांनो बारावी सर्व विषयात नापास झालेला तरुण मुलगा पुढे जाऊन आयपीएस अधिकारी बनतो. त्याचे नाव आहे मनोज कुमार.

आज आपण पाहतो आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडतात परीक्षेत कमी मार्क मिळाले, आई ओरडली ,वडिलांनी मारलं ,शिक्षकांनी मारलं ,मोबाईल मिळाला नाही अशा अनेकविध कारणांमुळे मुलं नको त्या प्रकारांना बळी पडतात. याउलट अशा मुलांमध्ये आपण सकारात्मक करण्याची ठिणगी पाडली पाहिजे. .ही ठिणगी चरित्रे, कार्यक्रम, प्रसंग यातून निर्माण होत असते.

मित्रांनो आपण जेवढी महान चरित्रे वाचली. ही चरित्रे एका रात्रीत निर्माण झाली नाहीत. या सर्व व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काहीना काही कठीण प्रसंग ,अडचणी ,अडथळे आले होते आणि त्यातून त्यांनी सकारात्मक प्रेरणा घेऊन वाट काढली मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अडथळे ,अडचणी निर्माण होत असतात त्यातून आपण सकारात्मक प्रयत्न घेऊन जर पावले टाकली तर आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची गोडी लागली याचे एकमेव कारण ते जेव्हा शाळेत शिकत होते. तेव्हा ते दलित असल्यामुळे त्यांचे कोणी मित्र नव्हते,त्यांच्याशी कोणी बोलायचं नाही, खेळायचं नाही ,त्यांना कोणीच मित्र नव्हते आणि म्हणून एके दिवशी शाळेत जात असताना भर पावसामध्ये कोणी मित्र नाही म्हणून रडत रडत चाललेले असतात .

अशा वेळी त्यांचे वडील त्यांना वाचनासाठी पुस्तक आणून देतात आणि त्या दिवशीच ठरवतात की ,’ पुस्तक माझा मित्र आहेत’ .इथूनच त्यांच्या पुढील आयुष्याला सुरुवात होते आणि जगातील सर्वोच्च आदर्श विद्यार्थी बनण्याचा मान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो.

ज्योतिराव फुले हे आपल्य मित्राच्या वरातीमध्ये सामील झालेले असतात .अशा वेळेस वरातीमध्ये असणारे लोक ज्योतिरावांना चिडवतात.त्यांच्या मनामध्ये जातीय द्वेष निर्माण होत नाही.

तर गोरगरिबांसाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होते आणि गोरगरीब दीनदलित यांसाठी कार्य करून ते’ महात्मा’ बनतात .

मित्रांनो आपल्या सगळ्यांमध्ये विविध प्रकारच्या प्रेरणा या पुस्तक वाचून ,दुसऱ्यांचे भाषण ऐकून निर्माण होत नसतात .तर प्रेरणा निर्माण होण्यासाठी सतत धडपड करावी लागते, ध्येय ठरवावं लागतं, त्यासाठी लागणारे अडथळे पार करावे लागतात आणि आपल्या अंतर्गत शक्तीचा पुरेपूर वापर करून आपल्याला ती गोष्ट प्राप्त करता येते आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकामध्ये ठिणगी पडली पाहिजे. हे ठिणगी सकारात्मक असावी .

Scroll to Top