मित्रांनो गरुड पक्षी सर्वांना माहीत आहे.आपण गरुडाची गोष्ट पाहणार आहोत. गरुडाच वय जस-जस वाढायला लागते तशी त्याची चोच झिजायला लागते . पंख थकून जातात आणि नीट उडता येत नाही.

खरंतर गरुड सत्तर वर्षे जगू शकतो पण एवढे करण्यासाठी गरुडाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात .यावेळी त्याच्यासमोर दोन पर्याय असतात प्राप्त परिस्थितीला स्विकारुन जीवन संपवायचं किंवा मग 150 दिवसांच्या खडतर व वेदनादायी प्रक्रियेने स्वतःचं पुनरुज्जीवन घडवून आणायचं. याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पर्वताच्या कपारीमध्ये असणाऱ्या आपल्या घरट्यात स्वतःला अज्ञातवासात कोंडून घ्यायचं आणि झिजलेली ,वाकडी झालेली चोच दगडावर आपटायला सुरुवात करायची. जोपर्यंत तीच गळून पडत नाही तोपर्यंत तिला तो आपटतो व जुन्या चोचीच्या ठिकाणी त्याला नवी कणखर बाकदार चोच येते .

त्यानंतर तो आपल्या जुन्या झडणाऱ्या पंखांना आपटायला सुरुवात करतो आणि त्यांनाही वेदनेच्या भरात शरीरापासून वेगळे करतो .हळूहळू त्याला नवे तेजःपुंज पंख फुटतात. पुनरुज्जीवनाचा पाच महिने चाललेला प्रवास त्याच्या रोमारोमात नवचैतन्य भरतो आणि पुन्हा थकलेला गरुड तीस वर्ष अत्यंत उभारीने जगतो .
मित्रांनो आपल्या सर्वांचे आयुष्य असंच घडत असतं. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात की त्या वेळेला आपण असं ठरवतो की आता नाही ….परंतु जर आपण असं ठरवलं आपल्याला झगडायचे आणि मिळवायचे तर आपण आयुष्यामध्ये आपले ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक गोष्ट प्राप्त करत असतो . यासाठी प्रेरणा निर्माण व्हावी लागते.
मित्रांनो आपल्यालाही जेवढ आयुष्य मिळाले तेवढेच आयुष्य महात्मा गांधी, लोकमान्य टिळक ,स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू ,अल्बर्ट आईन्स्टाईन ,न्यूटन यांनाही मिळाल होतं. मग आपण असे काही मोठे होण्याची स्वप्न बघतो का ? त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ध्येयाने प्रेरित होतो का? प्रेरित झाल्यानंतर पुन्हा एक एक पायरी गाठतो का ? प्रेरणा मिळाली का ?असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.
मित्रांनो हे सगळं घडण्यासाठी आपल्याला इतरांनी प्रेरित करायची गरज नसते यासाठी एकच गरज असते ते म्हणजे आपल्या आतमध्ये ठिणगी पडण्याची. जेव्हा ठिणगी पडेल आणि ठिणगीच रूपांतर एका ऊर्जेने भरलेल्या स्फूलिंगात होईल तेव्हा आपलं मोठं होणं सुरू होतं . यालाच प्रेरणा मिळाली असे म्हणतात.

आणखी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली हे पाहूया.
‘ मी सरपंचाचा मुलगा असल्यामुळे नेहमी मास्तरांच्या खुर्चीत बसायचो आणि गरीब वर्गमित्रांना त्रास द्यायचो.आताच्या भाषेत रॅगिंग करायचो. शिक्षकांनी विनंती केली की खुर्चीतून समोरच्या रांगेत जाऊन बसायचं. खरंतर मला हुशारीचा, वडील सरपंच असल्याने थोडा माज चढलेला होता.

एके दिवशी असाच शिक्षकांच्या खुर्चीत वर बसलेलो होतो तेवढ्यात नव्या वर्गशिक्षिका कदम बाई आल्या. माझं लक्ष नव्हतं. सगळेजण उभे राहिले .मी मात्र गुर्मीत बसूनच राहिलो .तशाच त्या माझ्याजवळ आल्या व माझ्या दोन कानशिलात भडकावून दिल्या.

” तू पहिलवानाचा मुलगा आहेस ना ? “
” हो “
” गावचा दादा “
” शिक्षकांचा अपमान करतोस ,चांगल आहे का असं वागणं ? असंच वागत राहिलात तर मोठा गुंड होशील “
स्वतःच ,आमच आणि आई वडिलांचे नाव उज्वल करशील की भावकीच्या ,गुंड मुलांच्या मदतीने गरीब मुलांना असा त्रास देत राहशील?

असं केलंस तर खेड्यातल्या किड्या मुंग्यांसारखे दुसऱ्यावर अवलंबून राहशील.

अरे तुला तुझी काय ओळख आहे का नाही ?

हुशार पण बिघडलेला गावगुंड मुलगा !
‘ विद्या विनयेन शोभते ‘ नम्रता अंगी नसेल तर हुशारीला कवडीचीही किंमत नाही, चालता हो माझ्या वर्गातून…
अशा त्वेषानं आडवेतिडवे बाई बोलल्या पण या अपमानाने माझ्यातला स्फुल्लिंग नक्कीच पेटला!!!

त्यानंतर माझी शाळा बदलली मला चांगले गुरुजी मिळाले आणि त्यांनी नेहमीच मला प्रेरित केलं .माझे नवे वर्गशिक्षक लाखोळी गुरुजी होते एकदा वर्गात त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला,” तुम्ही मोठे झाल्यावर कोण होणार ?” हा प्रश्न विचारला होता. का कोणास ठाऊक मी त्यांना विचारलं,” गुरुजी सगळ्यात मोठा अधिकारी कोणता? गुरुजी,” कमिशनर” असे उत्तर दिले.

मग मी विचारलं,” मी कमिशनर होऊ शकतो का?”

सगळे मला हसायला लागले

तेव्हा गुरुजींनी माझं कौतुक केलं आणि स्वप्न पहायचं तर खूप मोठी. तुम्ही गाठलेली उंची ही तुम्ही कुठून सुरुवात केली यापासून मोजली जाते .उच्च ध्येय ठेवायचे , स्वप्नं पाहायची, स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठीची जिद्द ठेवायची, त्याला प्रयत्नांची जोड द्यायची आणि मग काय तुम्ही देशाचे राष्ट्रपतीही होऊ शकता,असं नेतृत्व करू शकता. हे त्यांचे शब्द त्सुनामीप्रमाणे ऊर्जेची लाट घेऊन आले आणि माझी गाडी रुळाला लागली. मला प्रेरणा मिळाली.

मित्रांनो खूप सारे परिश्रम केले की आपल्याला ध्येय प्राप्त करता येते आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्या मनातील स्फुल्लिंग प्रज्वलित करावं लागतं . स्फुल्लिंग प्रज्वलित करण्यासाठी आपल्या मनामध्ये ठिणगी पडावी लागते आणि ही ठिणगी आपल्याला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये ,रूपामध्ये पडत असते .फक्त त्याचे रूपांतर आपल्याला स्फुल्लिंगात करता यायला पाहिजे. हीच खरी प्रेरणा. यानंतरचा सगळा प्रवास आपणा सर्वांना माहितच आहे .तो मी म्हणजेच विश्वास नांगरे पाटील

मित्रांनो प्रेरणा म्हणजे काय ? वर्तमानाचा भाग आणि तो कार्य करण्यास ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यास आपल्याला भाग पडत असतो .जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण उपलब्ध असलेल्या मार्गांचा अवलंब करून शोध घेतो .आपल्याला हवे असलेले अन्न आपण मिळवतो. अन्नाचा शोध घेतला की आपलं काम थांबतं आणि आपण पोटभर जेवलो की आपल्याला समाधान मिळतं.
ज्या विशिष्ट कारणांमुळे किंवा घटकांमुळे विशिष्ट ध्येयासाठी माणूस कार्यप्रवृत्त होतो या अवस्थेला प्रेरणा म्हणतात .
मित्रांनो भूक लागणे ,तहान लागणे ,झोप, मातृत्व ,तापमान नियंत्रण या शारीरिक प्रेरणा आहेत .प्रत्येक माणूस हा या ना त्या मार्गाने पूर्ण करत असतो. मात्र अडथळ्यांवर मात करून आणि शक्तीचा योग्य वापर करून काहीतरी अवघड गोष्ट जितक्या शक्य तितक्या लवकर प्राप्त करून घेणे याला अचिव्हमेंट असे म्हणतात आणि ही अचिव्हमेंट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या ना त्या मार्गाने येत असते आणि आपण ती प्राप्त करतो .

ज्या व्यक्तींमध्ये अचिव्हमेंट प्राप्त करायची जिद्द असते ती व्यक्ती हाती घेतलेले कोणतेही कार्य उच्च दर्जाने करत असल्याचे आढळते. या स्वीकारलेल्या कार्यामध्ये यशस्वी होण्याचा चिकाटीने प्रयत्न करत असते आणि आव्हानात्मक काम स्वीकारून ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात जास्त पसंती असते. ही प्रेरणा व्यक्तींमध्ये ठिणगीप्रमाणे काम करते. त्यामुळे व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होऊन आर्थिक ,विज्ञान, नेतृत्व आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करून सर्वोच्च शिखरावर जात असते.

आणि म्हणूनच’ प्रेरणा ‘ हीच खरी ध्येयप्राप्तीची ऊर्जा.

Scroll to Top